⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | धक्कादायक : कारागृहात १२ कैद्यांच्या हल्ल्यात पाचोऱ्याचा पोलीस जखमी

धक्कादायक : कारागृहात १२ कैद्यांच्या हल्ल्यात पाचोऱ्याचा पोलीस जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून ते मूळचे पाचोरा येथील असल्याचे कळते, दरम्यान, जखमी पोलीसाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. 

प्रभूचरण नानाजी पाटील असे जखमी पोलिसाचे नाव आहे. सुमारे 10 ते 12 कैद्यांनी हा हल्ला चढविला आहे. नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये काही दिवसांपूर्वी संबंधित कैद्याला आणले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात हा कैदी 302 च्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. संबंधित कैद्यास दुसऱ्या बॅरेक मध्ये जाण्यास बंदी केल्याने त्याने बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकावर हल्ला केला. बुधवारी सकाळच्या सुमारास कैद्यांची तपासणी सुरु असताना संबंधित कैदी दुसऱ्या बॅरेक जात असल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. यावेळी सुरक्षारक्षकाने त्यास हटकले असता त्याने सुरक्षारक्षकास मारहाण करण्यास सुरवात केली. 

त्यानंतर संबंधित कैद्याच्या इतर दहा ते बारा मित्र बंदीवानांनी सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसास दहा ते बारा जणांच्या घोळक्याने दगड आणि लाथा बुक्यांनी मारहाण केल्याने सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुरक्षारक्षकास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरु असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. 

दरम्यान, या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षारक्षकांसह पोलीस कर्मचारी सुरक्षित आहेत की, नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. प्रभू चरण पाटील हा सुरक्षारक्षक कारागृहात असताना त्यांच्यावर हल्ला झाला, म्हणजे कारागृहात असताना देखील कैद्याची मुजोरी किती वाढली आहे? वेळीच इतर कर्मचाऱ्यांनी संशयिताच्या जवळील दगड हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

author avatar
टीम जळगाव लाईव्ह