खडसेंना धक्का : जिल्हा दूध संघावर ‘प्रशासकराज’, आ. मंगेश चव्हाण प्रमुखपदी!

जुलै 28, 2022 8:36 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । एकनाथ खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघातील कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरकारने समिती नियुक्त केली आहे. दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

jalgaon jilha doodh sangha jpg webp

 माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार सरकारकडे केली होती. मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती. शिंदे गट व भाजपचे युती सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने याप्रकरणी पाच जणांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाताई खडसे अध्यक्ष असलेले संचालक मंडळ बरखास्त करून येथे प्रशासक नियुक्त केले आहे.

विशेष लेखापरीक्षक अध्यक्ष असलेल्या या चौकशी समितीत पाच जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव नी. भा. मराळे यांनी पारित केले आहेत, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदार नगराज पाटील यांनी दिली आहे. 

प्रशासकांमध्ये शिंदे गटातील आमदार तर गिरीश महाजन यांच्या स्वीय सहाय्यक

शिंदे सरकारकडून जे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. त्यात ११ जणांचा समावेश आहे. यात शिंदे गटात सहभागी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांचा समावेश आहे. प्रशासक मंडळात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, भाजप आमदार मंगेश चव्हाण, अजय एकनाथ भोळे, आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद भगवान देशमुख, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक नामदेव कांडेलकर, गजानन पुंडलिक पाटील, अमोल पंडितराव शिंदे, विकास पंडित पाटील या ११ जणांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now