⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर? आ.चिमणराव पाटलांचा ना.गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । जळगावमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत आहे, मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतले जात नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून नियोजन समितीमधून निधी देताना देखील माझ्याबद्दल दुजाभाव केला गेला’ असा थेट आरोप आमदार चिमणराव पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. आपण पक्ष सोडून जावे यासाठी पक्षातून काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. चिमणराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच आता चव्हाट्यावर आली आहे.  

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने खासदार संजय राऊत यांनी दौरा केला. त्यांचा दौरा झाल्यानंतरही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी थांबलेली नाही. पारोळा येथील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आज जाहीरपणे शिवसेनेचे उपनेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. 

आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, पक्षात मला विनाकारण स्थानिक नेते त्रास देत आहेत. मी पक्षातून बाहेर जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे. पक्षात अलीकडेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख दिला आहे. माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत आपणास साधी माहिती देखील देण्यात आली नाही, अशी खंत चिमणराव यांनी व्यक्त केली.