जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं. यांनतर आता निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
उद्या २३ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे आता विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उपस्थितीत होते.
शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक
आता नुकतंच विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आहे.
यावेळी शरद पवारांनी महाविकासआघाडीला १५७ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शरद पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशीही सूचनाही दिली.