नियमित पगार मिळत नसल्याच्या रागातून 50लाखांच्या सोन्यासह रोकड लांबवणाऱ्या नोकराला अटक

ऑगस्ट 23, 2022 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । बांधकाम व्यावसायीकाकडे कामास असलेल्या नोकराने नियमित पगार मिळत नसल्याच्या रागातून 50लाखांच्या सोन्यासह रोकडवर डल्ला मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी रविवारी दुपारी दोन वाजता मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

crime 26 jpg webp

राहुल रोशन कामत (25, मर्णेया, उमरकट, जि.मधुबनी, बिहार) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. राहुल कामत हा संशयीत मुंबईतील खारघर भागातील बांधकाम व्यावसायीक मुकेश गांधी यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता. मात्र, पगार मिळताना होणारी हेळसांड पाहता आरोपीने त्या द्वेषातून गांधी दाम्पत्य 15 ऑगस्ट रोजी देवदर्शनाला गेल्याची संधी साधून गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी कटरद्वारे कपाटांचे कुलूप तोडून त्यातील 43 लाखांचे सोने, तीन लाख 84 हजारांची रोकड, महागड्या घड्याळी व फोन, फाईल्स असा ऐवज लांबवून पळ काढला होता.

आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मुंबईत एक दिवस काढला व नंतर तो बोरीवलीहून सुरत व तेथून अंत्योदय एक्स्प्रेसने गावाकडे निघाला. मात्र, रविवारी दुपारी भुसावळात अंत्योदय एक्स्प्रेस आल्यानंतर जनरल बोगीतून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. खार पोलिसांचे उपनिरीक्षक कुंभारे व कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री 12 वाजता आरोपीला अटक करीत मुद्देमाल ताब्यात घेतला.

भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहाय्यक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, ठाकूर, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले आदींच्या पथकाने कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now