जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२५ । छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका मोठा रेल्वे अपघात घडलाय. गटोरा आणि बिलासपूर स्टेशनदरम्यान मेमू लोकल ट्रेन आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, या धडकेत सहा प्रवासी ठार झाले आणि डझनभराहून अधिक जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की प्रवासी ट्रेनचा एक डबा मालगाडीवर कोसळला.

जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. घटनास्थळी वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलंय.घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि रेल्वे प्रशासनाने अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

अपघातामुळे संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा वळवण्यात आल्या आहेत.
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोयीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. माहिती आणि मदतीसाठी हे क्रमांक २४ तास उपलब्ध असतील.
चंपा जंक्शन: ८०८५९५६५२
रायगड: ९७५२४८५६०
पेंद्र रोड: ८२९४७३०१६२
याव्यतिरिक्त, घटनास्थळी दोन आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यावर कुटुंबातील सदस्य आणि प्रवासी मदतीसाठी कॉल करू शकतात. हे क्रमांक ९७५२४८५४९९ आणि ८६०२००७२०२ आहेत.











