खळबळजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कुटुंबियांना मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द या गावी उघडकीस आला आहे. घटनेनंतर संशयीत व त्याच्या पित्याने पीडितेच्या कुटुंबियांना शिवीगाळ व मारहाण देखील केली. या घटनेप्रकरणी दोघा पिता पुत्रांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण साहेबराव पाटील आणि साहेबराव हरचंद पाटील दोघे रा. खेडी खुर्द प्र जळोद अशी दोघांची नावे आहेत.

अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द गावी अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या घरात आई, आजी-आजोबांसह झोपलेली असताना दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान भूषण साहेबराव पाटील याने तिचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे बघून तिच्या आईने तरुणास प्रतिकार केला. मात्र अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करुन तो पळून गेला.

काही वेळाने भुषण व त्याचे वडील साहेबराव पाटील असे दोघे त्याठिकाणी आले. त्या दोघांनी मिळून जातीवाचक गलिच्छ शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भूषण पाटील व साहेबराव पाटील विरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), २९४, ४४८, पोस्को आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले करीत आहेत.