गुन्हेजळगाव शहर

Jalgaon : उधारीवर पान-सिगारेट न दिल्याने दुकानदारावर कोयता-तलवारीने हल्ला; तिघे जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ एका पान टपरी व्यावसायिकावर उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून धारदार कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कारवाई करत तीन संशयित आरोपींना जेरबंद केले असून, एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमकी घटना?

जखमी फिर्यादी किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१, रा. शिवनगर, खेडी बु., जळगाव) हे भंगार व पान टपरी चालवतात. काल दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या पान टपरीवर येऊन उधारीवर पान-सिगारेट मागितली. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपी संतापले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत, “तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान आरोपी आनंद हरी पाटील याने त्याच्याकडील धारदार कोयत्याने तर हर्षल रवींद्र शिंदे याने हातातील तलवारीने फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले.हल्ल्यात जखमी झालेले किशोर बाविस्कर हे जळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील

आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रवींद्र शिंदे (वय २०), गौरव विनोद पाटील (वय २०) (सर्व रा. खेडी, ता. व जि. जळगाव) याशिवाय एका विधिसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोना प्रदीप चौधरी, पोहेकॉ संजीव मोरे, पोकॉ नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे, सुभाष साबळे आणि राहुल पाटील यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button