
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर फत्तेपुर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत विमल पानमसाला, V-1 सुगंधित तंबाखू आणि इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी झाली कारवाई
२२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम फत्तेपूर ते कसबापिंप्री रस्त्यादरम्यान प्रतिबंधित विमल पानमसाला आणि व्ही-१ (V-1) सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रात्री १०:३० वाजेच्या सुमारास प्रसाद दामू वाणी (वय २१, रा. चिंचोलीपिंप्री, ता. जामनेर, जि. जळगाव) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले.
या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर हिंमताराव बाविस्कर यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन फिर्याद दिली. त्यानुसार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने त्यास २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोउपनि योगेश महाजन, हेकॉ गणेश तडवी, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, चेतन तांडव व अरुण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.





