⁠ 
सोमवार, मे 6, 2024

धक्कादायक : नातेवाईकांना सांगितले प्लास्टिक आणा आणि प्रेत गुंडाळून घेऊन जा…

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । नितीन ठक्कर । एरंडोल – येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटर मध्ये अजब व भयंकर प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे दगावलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांना प्लास्टिक आणून प्रेत गुंडाळायला सांगितल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अरुण भिका महाजन नावाच्या व्यक्तीचे कोरोना मुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे प्रेत हे रुग्णालयातील शविच्छेदन गृहात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलावून प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लॅस्टिक आणण्यास सांगितले.त्यानंतर नातेवाईकांना स्वतः प्रेत गुंडाळण्यास सांगितले असल्याचा आरोप महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया चे प्रदेशाध्यक्ष उमेश महाजन यांनी केला आहे.

यावेळी स्वतः वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यावर त्यांना कोविड केअर सेंटर च्या बाहेर ठिकठिकाणी हॅण्ड ग्लोज,पी.पी.ई. किट, कोरोना रुग्णांचे वापरलेले औषधीचे व अन्य साहित्य उघड्यावर पडलेले दिसले. तसेच याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील किंवा कोणताही महत्त्वाचा व्यक्ती या कोवीड केअर सेंटरला दिसले नाही.एरंडोल ग्रामीण रुग्णालयात असलेल्या या कोविड केअर सेंटर मध्ये सुरू असलेल्या या प्रकारामुळे याठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या ठिकाणी शहर तथा तालुक्यातून अनेक लोक कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचे इलाज करण्यासाठी येत असतात. त्यात त्यांना या भयंकर गोष्टींचा सामना करून इलाज करावा लागत आहे. रुग्णालयाच्या आवारात पडलेल्या पी.पी.किट, हॅण्ड ग्लोज व अन्य साहित्यामुळे नक्कीच कोरोना चा फैलाव मोठ्याप्रमाणात होऊन तालुक्यात कोरोना संख्या वाढू शकते. ग्रामीण रुग्णालयातच जर अशा प्रकारे अस्वच्छता असेल तर मात्र कोरोना कसा आटोक्यात येईल असा प्रश्न करुन सदर रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप देखील महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया चे प्रदेशाध्यक्ष उमेश महाजन यांनी केला आहे.