⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सर्वांना सोबत घेवून चालणाऱ्या सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तीमत्व स्मिताताई वाघ

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२४ । भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सक्रीय असलेल्या स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत रिगंणात उतरविण्यात आले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच एका महिलेला संधी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या इतीहासात जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून त्यांनाच संधी मिळाली होती. त्या संधीचे त्यांनी सोनं केल्यानंतर आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा इतिहास घडविण्याची संधी दिली आहे. दि.२६ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने, त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला प्रकाश….

अभाविपच्या कार्यकर्त्या…अभ्यासू, आक्रमक, धडाडी, सुसंस्कृत सिनेट सदस्या…भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या…जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा…अशी कितीतरी भुमिका स्मिताताईंनी यशस्वीपणे निभावल्या आहेत. स्मिताताईंनी जळगाव शहरात १९८४ पासून अभाविपच्या माध्यमातून संघटनेचे कार्य सुरु केले. स्मिताताईंचे वडील येवला पंचायत समिती सभापती तर सासरे डांगरी बुद्रुक या गावाचे २५ वर्षे सरपंच होते यामुळे त्यांना राजकारणाचे बाळकडू कुटूंबातूनच मिळाले. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात अभाविपपासून जेंव्हापासून त्या अभाविपला जोडल्या गेल्या तेंव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेकवेळा आवाज उठवला. या अनुभवाचा फायदा त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती व्हावी यासाठी उभारलेल्या जनआंदोलनावेळी झाला.

१९९१ पासून राजकीय क्षेत्रात प्रवेश करीत भाजपा कार्यकारिणी सदस्यापासून विधानपरिषदेच्या सदस्यापर्यंत काम करण्याची संधी भाजपाने दिली. २००२ मध्ये अमळनेर मंगरुळ गटातून प्रथम त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली. त्यात सर्वाधिक मतांनी त्या विजयी झाल्या होत्या. सातत्याने तीन वेळा अमळनेर मंगरुळ जि. प. गटातून निवडून आलेल्या स्मिताताईंनी जळगाव जिल्हा परिषदेच्या महिल्या महिला अध्यक्षपद देखील भुषविले. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असतांना त्यांनी सिंचन, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहे. महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. यासह अभ्यासू सिनेट सदस्य म्हणून त्यांनी विद्यापीठच्या कामाकाजात स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. राजकारणासोबत वाघ यांनी सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. १९९६-९७ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडून उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचे व गोरगरिब लोकांसाठी सतत काम करणे हा स्मिताताईंचा वैशिष्टपूर्ण गुण. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत राजकीय जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटविला. या प्रवासात स्मिताताई यांना त्यांचे पती स्व. उदयबापू वाघ यांनी खंबीरपणे साथ दिली. उदयबापूंच्या नंतर त्यांचा वारसा व कार्य पुढे नेण्याचे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे. राजकीय जीवनात वावरतांना सर्वांना सोबत घेवून चालण्याची त्यांची प्रामाणिक वृत्ती इतरांपेक्षा वेगळी ठरवते. त्यांना आता भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभेत संधी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. बेरोजगारांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन त्यांना काम देणे, दळणवळणाच्या सुविधा अधिक सुखकर करण्यावर भर राहणार आहे. रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, रस्ते, वीज या मुलभूत गरजांवर मोठे काम करण्याची संधी आहे. बचत गटाच्या महिलांना मोदीजींच्या दूरदृष्टीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध करुन दिले जात असल्याने ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग निर्माण झाले आहेत. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमळनेरसह पाच तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव जाणे महत्त्वाचे होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करुन त्याला देवेंद्र फडणवीस यांनी आकार दिला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ता नसल्यामुळे त्याला खिळ बसली मात्र देवेंद्र फडणवीस हे जल खात्याचे मंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. पाडळसरेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दरबारात पोहचविण्याचे काम आपल्या हातून झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे व्हिजन असलेल्या स्मिताताई वाघ यांना आमच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.