जळगाव शहरराजकारण

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपाआधीच महायुतीच्या ३ जागा बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असतानाच तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांमध्ये संबंधित उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या तिन्ही जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, नलिनी पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री, तर मृणाल पाटील या त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवरील निवडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून रजनी संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्या मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी आहेत. अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांवर राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची वर्णी लागली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच आमदार अमोल पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा करून आपल्या दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट?

या संपूर्ण घडामोडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. शिवसेना शिंदे गटातील एका गटाची भाजपसोबत जुळवून घेण्याची तयारी असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.त्यामुळे उर्वरित जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात नेमके कसे समीकरण जुळणार, कोण किती जागांवर दावा करणार आणि अखेर महायुती एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button