जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामात धरणगाव चौफुलीपासून दत्त मंदिरापर्यंत एकही अंडरपास न दिल्यामुळे शेतकरी व नागरिकांना दोन ते अडीच किलोमीटर अंतर फिरून जावे लागत असते. बस स्थानकापासून कासोदा नाक्यापर्यंत सर्विस रोड, कासोदा नाक्यावर धरणगाव, कासोदा, भडगाव रस्त्यावरील चौफुलीवर जंक्शन चा प्रश्न, पिंपरी रस्त्यावरील जंक्शन चा प्रश्न निर्माण झाल्यामुळे एरंडोलकरामध्ये संतापाची लाट उसळली होती. शहरवासीयांची जोरदार मागणी लक्षात घेऊन आ. चिमणराव पाटील यांनी तातडीने ‘नही’ च्या अधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली व एरंडोलवाशी नागरिक व ग्रामीण भागातील नागरिक यांच्या रहदारी संदर्भातील प्रमुख अडचणी व साधाकबाधक विचारविनिमय होऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे नही’ च्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी आ. चिमणराव पाटील यांना धन्यवाद दिले.

एरंडोल बस स्थानकापासून महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड कासोदा नाक्यापर्यंत करण्याचा प्रस्ताव आ. चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा तसेच कासोदा नाक्या नजीक महामार्गावर जंक्शन तयार करावे व हिंगोणा पिंपरी फाट्यावर जंक्शन द्यावे असे सुचित करण्यात आले. आ. चिमणराव पाटील यांनी चौपदरीकरण कामाचा नकाशावर गावालगतच्या निर्माण होत असलेल्या समस्या आस्थेवाईक पणे जाणून घेतल्या. त्या सोडवण्याकामी काय काय उपाय योजना करता येतील याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
या बैठकीस डी. एम. मिश्रा जी. एम. प्रोजेक्ट , ए. के. राऊत , स्वतंत्र गौरव डिव्हिजन मँनेजर ( नाही ), अनुपकुमार श्रीवास्तव , समन्वयक अरुण सोनवणे या अधिकाऱ्यां पुढे एरंडोल न.पा.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी रहदारी संदर्भातील समस्या प्रभावीपणे मांडल्या. या शिवाय समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व किशोर निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, संभाजी पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत चर्चा केली. यावेळी रुपेश माळी, शालीग्राम गायकवाड, रवी जाधव, शुभम चौधरी, मयूर महाजन, विशाल सोनार, आनंद दाभाडे, दीपक गोसावी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.