अरे वा! आता काही तासांत चेक क्लिअर होणार; RBI सुरु करणार नवीन प्रणाली..

ऑगस्ट 14, 2025 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । बँकांमध्ये चेक जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल करून रिझर्व्ह बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. RBI ४ ऑक्टोबर २०२५ पासून चेक क्लिअरिंगची एक नवीन प्रणाली सुरू करणार आहे. ज्यामुळे तुमचा चेक काही तासांत क्लिअर होईल.

cheque

खरंतर आपल्या देशातील बँकिंग प्रणालीमध्ये चेक क्लिअरन्सला बराच वेळ लागतो. म्हणजेच चेकने पेमेंट केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी २-३ दिवस लागतात. या विलंबामुळे सामान्यतः चेकने पेमेंट देणाऱ्या किंवा घेणाऱ्या लोकांना किंवा व्यावसायिकांना त्रास होतो. मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जलद क्लिअरन्स सिस्टम सुरू करणार आहे. याद्वारे, चेक जमा केल्यानंतर काही तासांतच खात्यात पैसे येतील.

सध्याची चेक ट्रंकेशन सिस्टीम आणि बॅच प्रक्रिया काढून टाकून “सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑन रीअलायझेशन” ने बदलली जाणार असल्याचं आरबीआयने सांगितलंय. चेक बँकेत जमा होताच, त्याची स्कॅन केलेली प्रत ताबडतोब क्लिअरिंग हाऊसला पाठवली जाईल. त्यानंतर पैसे देणाऱ्या बँकेला पाठवली जाईल. तिथून बँकेला निर्धारित वेळेत चेक मंजूर करावा लागेल किंवा नाकारावा लागेल, असं आरबीआयनं सांगितलंय.

नवीन प्रणाली दोन टप्प्यात लागू

ही नवीन प्रणाली दोन टप्प्यात लागू केली जाईल. पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ पर्यंत असेल. यात चेक मिळाल्यानंतर बँकेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कन्फर्मेशन देणे आवश्यक आहे. जर बँकेने कन्फर्मेशन दिले नाही तर चेक आपोआप स्वीकारला गेला असे मानले जाईल.

तर दुसऱ्या टप्प्यात ३ जानेवारी २०२६ पासून, बँकेला चेक मिळाल्यापासून फक्त ३ तासांच्या आत तो क्लिअर करावा लागेल. उदाहरणार्थ, जर चेक सकाळी १० ते ११ च्या दरम्यान जमा केला गेला तर तो दुपारी २ वाजेपर्यंत मंजूर किंवा नाकारावा लागेल.

सर्व बँकांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक प्रेझेंटेशन सत्र असेल, ज्यामध्ये चेक सतत स्कॅन करून पाठवले जातील. पुष्टीकरण सत्र सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत चालेल. पहिल्या टप्प्यात, कामाची समाप्ती वेळ” संध्याकाळी ७ वाजता असेल, तर दुसऱ्या टप्प्यात तो फक्त ३ तासांपर्यंत कमी केला जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now