⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जनतेला बसणार आणखी आर्थिक झळ ! RBI उचलणार ‘हे’ पाऊल..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । मागील काही महिन्यात महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो (Repo Rate) दरात वाढ केली. त्यानंतर आता पुन्हा RBI पुढील आठवड्यात होणाऱ्या आर्थिक आढाव्यात रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ करू शकते. परदेशी ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने शुक्रवारी हा दावा केला आहे.

आरबीआयने मे महिन्यात रेपो दरात वाढ केली होती
मे महिन्यातही आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने धोरणात्मक दरात वाढ केली होती. ब्रोकरेज कंपनीने शुक्रवारी अहवालात म्हटले आहे की, मे महिन्यातही महागाईचा आकडा 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आणखी अनेक पावले उचलणे अपेक्षित आहे.

पुढील आठवड्यात 0.40 टक्के वाढ होऊ शकते
अहवालानुसार, आरबीआय पुढील आठवड्यात रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ करू शकते. याशिवाय, ऑगस्टच्या आढाव्यातही ते 0.35 टक्क्यांनी वाढू शकते. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात ०.५० टक्के आणि ऑगस्टमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्याचे ठरवू शकते. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच सांगितले की, चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेटमध्ये आणखी एक वाढ ही मोठी गोष्ट नाही.

रेपो दर वाढल्यास काय होईल?
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होईल कारण बँकांच्या कर्जाची किंमत वाढेल. रेपो रेट हा दर आहे ज्यावर बँका RBI कडून पैसे घेतात. हा दर वाढल्यावर बँकांना जास्त दराने कर्ज मिळेल. त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्त दराने व्याजही घेतील.