⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

आता सर्व कर्ज महागणार ! RBI ने 2 वर्षांनंतर केली रेपो दरात वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज बुधवारी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. RBI गव्हर्नरने रेपो दरात 0.40% वाढ केली आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागण्याची शक्यता आहे. यापूर्वी, आरबीआयने शेवटचा रेपो दर 22 मे 2020 रोजी बदलला होता.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. अर्थव्यवस्थेवर महागाईचा ताण कायम आहे. सातत्याने वाढणारी महागाई चिंताजनक आहे. युद्धामुळे महागाई आणि वाढीचा अंदाज बदलला आहे.

काय परिणाम होईल?
आरबीआयच्या वतीने रेपो रेट वाढवल्याचा फटका बँकांच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केल्याने बँका ग्राहकांना दिलेले कर्ज महाग करतील. वाढत्या व्याजदराचा परिणाम ईएमआयवर होणार आहे. ग्राहकांचा ईएमआय पूर्वीच्या तुलनेत वाढेल.

रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना RBI कडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादीवरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला आहे. महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो १३.११ टक्के इतका होता. त्यानंतर काही बँकांनी कर्जाचे दर वाढवले होते.