रेशनच्या तांदुळाची होत होती अवैध विक्री, वाचा काय केले पोलिसांनी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर बाजारपेठ हद्दीतील दोन गोदामासह दोन वाहनातून तीन लाख 10 हजार रुपये किंमतीचा सुमारे 35 क्विंटलहून अधिक तांदुळ जप्त केल्याने शहरातील तांदळाचा काळा बाजार करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. रविवार, 13 रोजी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन गोदामांना सील लावण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली तर साडेसहा लाख रुपये किंमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेतह.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील लिंबू मार्केट, आठवडे बाजार तसेच भारत नगर, भुसावळ येथे ट्रकमध्ये रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने ट्रक (क्रमांक एम.एच.04 ए.एल.7130) मधून 13 हजार 800 रुपये किंमतीचा 46 गोण्यातील तांदुळ जप्त करण्यात आला तसेच अॅपे रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू.0352) मधून रेशनच्या तांदळाच्या पाच हजार 700 रुपये किंमतीचा 19 गोण्या तांदुळ जप्त करण्यात आला तसेच लिंबू मार्केट, आठवडे बाजार येथील गोदामातून अडीच लाख रुपये किंमतीचा अंदाजे 20 ते 25 टन तांदूळ तसेच भारत नगरातील गोदामातून 30 हजार रुपये किंमतीचा 13 गोण्या तांदूळ (पाच टन) जप्त करण्यात आला तसेच भारत नगरातून 10 हजार रुपये किंमतीचा 20 कट्टे तांदुळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या रेशनच्या तांदळाचे एकूण बाजारमूल्य तीन लाख नऊ हजार 500 रुपये असून साडेसहा लाख रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून दोन्ही गोदामांना सील लावण्यात आले आहे.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
बाजारपेठ पोलिसात नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीनुसार अजिंक्य जैन, राहुल नारायण कानडे उर्फ राहुल लोणारी, ट्रक चालक शेख मोबीन शेख अजीज (देऊळगावराजा, जि.बुलढाणा), अॅपे चालक रईस बागवान असलम बागवान (भुसावळ), हमाल अकबर अली शेख बिसमिल्ला (भुसावळ), हमाल शेख इकबाल शेख बिसमिल्ला (भुसावळ), हमला शहबाज शेख इकबाल (भुसावळ), हमाल मुजफ्फर मेहमूद सैय्यद (भुसावळ), सोमनाथ कृष्णा सूर्यवंशी (भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला व पोलीस नाईक सुभाष साबळे करीत आहेत. दरम्यान, ट्रक चालक शेख मोबीन शेख अजीज व अॅपे चालक रईस बागवान असलम बागवान यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली.
रेशनचा तांदुळ ब्लॅकमध्ये विक्री करणारे रॅकेट
शहरात रेशनचा तांदुळ ब्लॅकमध्ये विक्री करणारे रॅकेट सक्रिय असून पोलिस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होत असताना पुरवठा विभागाकडून कारवाई होत नसल्याने पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेशनमाफिया गोरगरीबांच्या हक्काचा तांदुळ ब्लॅकमध्ये विक्री करीत असून या माध्यमातून मोठी टोळी सक्रिय आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेकदा कारवाया केल्या असल्या तरी बडे मासे मात्र अद्यापही मोकाटच आहेत. जिल्हाधिकार्यांनी भुसावळातील या बाबीकडे लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.