जळगाव लाईव्ह न्यूज | १० ऑक्टोबर २०२४ । भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना 6 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.
“माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
कसे होते रतन टाटा?
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली. टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिली आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत
राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज गुरुवारी 10 ऑक्टोबर एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.सध्या त्यांचे पार्थिव राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.