जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । केंद्रात पुन्हा एकदा भाजपाप्रणित एनडीएचे सरकार स्थापन होत असून त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु असून त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून या मंत्र्यांना फोन केले जात आहे. यात विशेष जळगाव जिल्ह्यातील रावेरमधून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रक्षा खडसे यांना देखील फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात आनंदाची लहर उसळली आहे.

यांना मंत्री पदासाठी फोन
मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार असल्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. यामध्ये नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे.दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. मात्र अजित गटातील प्रफुल पटेल हे देखील आज मंत्रिपदासाठी शपथ घेणार असल्याची चर्चा असून अद्याप त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.
रक्षा खडसे घेणार केंद्रीय मंत्री पदाची शपथ?
नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रक्षाताई निखील खडसे यांनी विजयाची हॅटट्रीक साजरी केली. त्या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती होती. यातच मंत्रीपदाच्या दावेदार असणार्या डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे रक्षाताई खडसे यांचा दावा अजून मजबूत झाला.
याच पार्श्वभूमीवर रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू असून त्यांना मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.