⁠ 
शनिवार, मे 4, 2024

रक्षा खडसेंनी घेतले सासरे एकनाथ खडसेंचे आशीर्वाद ; नाथाभाऊ म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ आज (दि २५) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं.

खरंतर यावेळी लोकसभेसाठी रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंना डच्चू दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केली. भाजप उमेदवार रक्षा खडसे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत

काय म्हणाले एकनाथ खडसे?
रक्षा खडसे यांनी मागील काळात चांगले काम केल्याचं म्हटलं. रक्षा खडसेंना त्यामुळंच पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे, असं खडसेंनी म्हटलं. जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद आजपर्यंत दिल्यामुळे त्या विजयी होतील, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. आपला भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला तरी आपण भावी काळात भाजप मधे प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रक्षा खडसे यांनी आपल्या घरातील देवांच्या पुजे सह मुक्ताई मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. त्याच बरोबर सासरे एकनाथ खडसे यांचे देखील आशीर्वाद घेतले आहेत. शुभकार्य करत असतो त्यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतो. आज तिसऱ्यांदा अर्ज भरत असताना सर्वांचे आशीर्वाद घेणार असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या..