जळगाव जिल्हा

दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा मोठा छापा! जळगावात ७.६५ लाखांचे तेल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या सणासुदीत खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असतानाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील तेल उत्पादक कंपन्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कंपनीकडून तब्बल ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४ हजार ४२५ किलो खाद्यतेल जप्त करून सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तेल उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खाद्यतेलासह मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळात ग्राहकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव एमआयडीसीतील सात प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची पथकाने कसून तपासणी केली.

या तपासणीदरम्यान एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत कंपनीतील ४ हजार ४२५ किलो तेलाचा साठा जप्त करून सील केला. या तेलाची किंमत ७ लाख ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत हा साठा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने केली.

जिल्हाभरातही धडक कारवाई

जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणीही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. पारोळा येथे एका केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चाळीसगावमध्ये ९ हजार १०० रुपये किमतीचा २४ किलो खवा जप्त करण्यात आला. धरणगाव येथे तब्बल १७ लाख २३ हजार रुपये किमतीचे ४ हजार ५०० किलो तेल जप्त करण्यात आले. तर चोपडा शहरात अस्वच्छ वातावरणात तयार केले जात असलेले १६ हजार रुपये किमतीचे पेढे जप्त करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, तेल आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button