⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

रंगमंचामागील नाटक : पार्श्वसंगीताची गंमत : राज्य नाट्य स्पर्धेतील एक गोष्ट भाग ४

जळगाव लाईव्ह न्यूज । योगेश शुक्ल । राज्य नाट्य स्पर्धेत हौशी मंडळींचीच नाटके असतात. पूर्वी राज्य नाट्य स्पर्धा नागरी आणि अनागरी अशा स्वरुपात व्हायच्या. त्यात आपल्या जळगावला अनागरी स्पर्धेचे केंद्र होते. संपूर्ण राज्यभरातून अनागरी स्पर्धेसाठी नाटकं येत असत. त्याकाळातील जळगावकर रसिकांना ४० – ४५ दिवस वेगवेगळी नाटके पाहण्यास मिळत असत. अनागरीतील नाटकं ही साधारणतः बोली भाषेतील असायची.

अशाच एका अनागरी स्पर्धेतील नाटकाचा किस्सा… आम्ही नाटकवेडे असल्याने सकाळपासून बालगंधर्व नाट्यगृहात जसा वेळ मिळेल तसे जाऊन, त्या त्या संघाची तयारी पहात असू. कारण उत्सुकता असायची ना की आजचा संघ काय वेगळे करणार आहे. तसेच दुसराही उद्देश असायचा तो म्हणजे नाटकात घडणाऱ्या एखाद्या ट्रीकसीनची तालीमही बघायला मिळायची, म्हणजे त्यामागचे गिमिक्सही कळायचे.

नागपूरहून आलेले एक नाटक बालगंधर्व नाट्यगृहात सादर होणार होते. या नाटकासाठीची तयारी सुरु होती. आम्ही पण गंमत पाहण्यासाठी पोहोचलेलो होतो. तेव्हा पार्श्वसंगीताची एवढी प्रगत साधने नव्हती. त्यामुळे बऱ्याचदा लाइव्ह पार्श्वसंगीत देण्याकडे कल असायचा. यातूनच मग गंमती जंमती घडत असत. या नाटकातही अशीच एक गंमत झाली. या नाटकाच्या अखेरीस गोळी घालून व्हिलनला ठार मारण्याचा प्रसंग होता. यासाठी त्यांची तालीम सुरु होती. गोळीच्या आवाजासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणे सुरु होते. चर्चांच्या अखेरीस फुगा टाचणीने फोडून आवाज करण्याचे ठरले. मग त्यानुसार तालिम सुरु झाली. वाक्य होते मी तुला गोळी घालून ठार मारेल. पण टायमिंग जुळत नव्हते. कधी वाक्याआधी फुगा फुटत होता तर कधी फुगा दोन तीन प्रयत्न करुन अपेक्षित तसा फुटत नव्हता. म्हणून मग असेही ठरले की तीन वेळा वाक्य घेऊनही फुगा फुटला नाही तर मग नायकाने खिशातून चाकू काढून खलनायकाला ठार मारायचे. झाले ठरल्याप्रमाणे तयारी झाली. कापडाच्या विंगेला फुगा आणि त्यासोबत टाचणी लावली गेली.

प्रयोग सुरु झाला. आम्ही उत्कंठेने त्या प्रसंगाची वाट पहात होतो. अखेरीस तो प्रसंग येऊन ठेपला. पहिल्यांदा वाक्य घेतल्यानंतर फुगा फुटला नाही. नायकाने रागाने विंगेत जो फुगा फोडणार होता त्याच्या पाहिले. तो बिचारा विंगेला लावलेली टाचणी शोधत होता. कारण तिथे लावलेली टाचणी तोपर्यंत दुसऱ्या कारणाने कोणीतरी नेली होती. ती काही केल्या सापडेना आणि फुगा काही फुटेना. अखेरीस नायकाने खिशातून चाकू काढून खलनायकाकडे जाण्यास सुरुवात केली. इकडे विंगेतील माणूस फुगा काढून कसा फोडू या विवंचनेत होता. विंगेत गडबड सुरु होती टाचणी कुठे आहे म्हणून. अखेरीस ज्याने टाचणी घेतली होती तो आला आणि त्यानेच फुग्याला टाचणी लावली. मात्र तोपर्यंत इकडे नायकाने खलनायकाच्या छातीत चाकू खुपसलेला होता. चाकू खुपसणे आणि फाट्‌ आवाज होणे ह्या क्रिया अगदी योगायोगाने एकाच वेळी झाल्या आणि प्रेक्षागृहात हास्याचा धबधबा कोसळला.

– योगेश शुक्ल
आर्ट डिपार्टमेंट हेड,
मृदंग इंडिया असोसिएटस्‌
मोबाईल – ९६५७७०१७९२