⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

नाटकावर प्रेम करणारी मंडळी? : राज्य नाट्य स्पर्धेतील एक गोष्ट भाग २

जळगाव लाईव्ह न्यूज । योगेश शुक्ल । नेमेचि येतो पावसाळा याप्रमाणे राज्य नाट्य स्पर्धा सुरु झाल्या की, आम्ही किती चांगले नाटक करत होतो किंवा नाटक कसे करावे, आमच्यावेळी असे नव्हते, किती प्रतिकुल परिस्थितीत आम्ही नाटक करत होतो, अरे नाटक इसको कहते है क्या? अशा अनेक वाक्यांसह अनेक जुने जाणते कधीनव्हे ते एखाद दुसरं नाटक केलेले काही मंडळी नाट्यगृहावर फिरु लागतात. पण ती आपला इतिहासात कधीच डोकावून पाहत नाही. प्रत्येक नाट्यकर्मी नवीन असतांना नवनवीन कल्पना लढवून आपले प्रयोग करत असतो. कधी प्रयोग फसतो तर कधी तो यशस्वी होतो.

असाच एक गंमतीशीर किस्सा आठवला म्हणून सांगावासा वाटला. मी, प्रा.डॉ.शमा सराफ, राजीव कुलकर्णी आणि तेजस देशमुख (हो आपल्या प्रा.राजेंद्र देशमुखांचा मुलगा) यांचे एक नाटक होते ‘टेडीबिअर’. या नाटकाच्या वेळी एक गंमत घडली. तेव्हा बालगंधर्व खुले नाट्यगृहाला स्पर्धा होत असत. बालगंधर्व दरवर्षी येणार्‍या राज्य नाट्य स्पर्धेला सज्ज होत होते. स्टेजवरील निघालेल्या लाकडी फळ्या नीट केल्या जात होत्या. (म्हणजे तात्पुरती डागडुजी), मेकअपरुमची स्वच्छता. या सगळ्यात स्टेजवरील फळ्या तात्पुरत्या लावल्याने कधीही निघू शकत होत्या. दर राज्य नाट्य स्पर्धेला चांगले म्हणणारे जसे असतात तसे स्पर्धेतील नाटक पडावे म्हणून प्रयत्न करणारेही असतात.

तेव्हा स्पर्धेत थोडीशी खुन्नसबाजीपण चालायची. तर या टेडीबिअर नाटकाच्या आधी सकाळी सकाळी येऊन जळगावातील एका ‘नाट्यप्रेमी’ माणसाने स्टेजवरील फळ्या उचकटून आत एक कुत्रा सोडला. प्राणीमात्राची दया म्हणून त्याला खायला बिस्कीटं व पाणीही ठेवलं. थंडीचे दिवस असल्याने व वर सेट ठोकला जात असल्याने ते कुत्रं स्टेजखाली दबकून बसून राहिलं. सेट ठोकतांना त्या निघालेल्या फळ्याही ठोकल्या गेल्या. प्रयोग सुरु झाला आणि लाईट लागल्यावर स्टेजखाली गरम होऊ लागलं. नाटकाचा पहिला प्रवेश सुरु असताना त्या कुत्र्यानं रडणं सुरु केलं. सुरुवातीला पार्श्‍वसंगीतातील आवाज असेल म्हणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण नाटक करत असलेल्या आमच्यात चुळबुळ सुरु झाली होती. ते कुत्रं आता जास्तच भेसूर रडायला लागलं. मग हा आवाज स्टेजखालून येतोय हे लक्षात येताच. एका प्रवेशानंतर नाटक थांबवून त्या कुत्र्याला बाहेर काढण्यात आलं. व पुढचं नाटक सादर झालं.

राज्य नाट्य म्हटलं म्हणजे अशा गंमती जंमती चालायच्याच. पण ह्या सगळ्या चढाओढी स्पर्धेपुरत्याच असायच्या. स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा जैसे थे व्हायचे. त्याकाळी कपाळावर कोणत्याही ग्रुपचा शिक्का असला तरी वेगवेगळ्या ग्रुपममधील मित्र एकत्र यायचे गप्पा मारायचे आणि पुन्हा पुढच्या स्पर्धेला सज्ज व्हायचे. (क्रमशः)

– योगेश शुक्ल
आर्ट डिपार्टमेंट हेड,
मृदंग इंडिया असोसिएटस्‌
मोबाईल – ९६५७७०१७९२