जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत असून यात जळगाव जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारी ३.३० नंतर पावसाने जोर वाढला.
यंदा जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पाऊस होत होता. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नव्हता.
मात्र, गेल्या काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपून काढलं होते. यामुळे शेतकरी राजा सुखावला होता. या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. यात सर्वाधिक नुकसान रावेर तालुक्यात झाले होते.
दरम्यान राज्यात पाऊस सक्रिय असून आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतु दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून जळगाव शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले होते.
दरम्यान, सध्या पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा मात्र वाढलेला नाहीय.मात्र जिल्ह्यात असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर लवकरच धरणांमधील पाणीसाठा वाढू शकतो.