जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध पाटणादेवी पर्यटनस्थळावर धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. कृष्णा संतोष गायकवाड ( रा. कन्नड) असे मृत तरुणाचं नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरण, तलाव, धबधबधे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली असून, धबधबधे, धरण, तलाव यासारख्या ठिकाणी पोहण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. हाच मोह तरुणाच्या जीवावर बेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड येथील रहिवासी असलेला कृष्णा हा धवलतीर्थ धबधब्याच्या परिसरात पाण्यात पोहत होता. पोहत असताना अचानक तो दिसेनासा झाला. नागरिकांनी शोधाशोध केल्यावर तो बुडाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
वनपाल कैलास चव्हाण आणि राजाराम चव्हाण यांनी शोधमोहीम राबवत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली. पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर कृष्णाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आला. पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यासह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
पावसाळ्यात धबधबे आणि पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, पाण्याचा वाढलेला प्रवाह, घसरडे दगड आणि अचानक बदलणारी पाण्याची पातळी यामुळे अशा ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित अंतर राखावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.










