⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा; जळगावसाठी ‘हा’ आहे हवामान विभागाचा अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । राज्यात येत्या 12 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कारण अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यानं ढग मोठ्या प्रमाणावर निर्माण होतायेत. परिणामी राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या सोमवारपर्यंत जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. विशेष: कोकणामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये देखील पाऊस सुरूच होता. मात्र कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मुंबकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती तर जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली. सलग सहाव्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या मार्गी लागल्या असून एकूण ७५ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी आटोपली.

राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यातच जळगाव जिल्ह्यात सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.