जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । दक्षिण अरबी समुद्रातून गेल्या दोन दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू झाली आहे. येत्या एक दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी देशातील अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रात देखील उद्या सोमवारपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उद्या सोमवारपासून मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पुढील चार दिवसात उत्तर महाराष्ट्रात देखील साेसाट्याचा वाऱ्यासह मेघगर्जनेसह पूर्वमाेसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली. या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, शनिवारी (२८ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे. या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून, ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन-तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.
दरम्यान ३० मेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पाऊस कोणत्या जिल्ह्यांत…
महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ३० मे ते १ जून या कालावधीत तुरळक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज