महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला..
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होतं दिसत असून यातच हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या क्षेत्रात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा जोर कमी होत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे येत्या २४ तासांत किमान तापमान ३ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून, अवकाळी पाऊस पडत आहे, ज्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला हवामान विभागने दिला आहे. अग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे, ज्यामुळे पश्चिम चक्रावातांच्या तीव्रतेमुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.
जळगावातील तापमान स्थिर?
जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे रात्री पारा १४ अंशावर स्थिर आहे. दुसरीकडे दिवसाच्या तापमानात मात्र घट झाली आहे. हिवाळ्यात ३० अंशाच्या सरासरीने असलेला दिवसाचा पारा मंगळवारी २५ अंशापर्यंत खाली आला होता. त्यामुळे मंगळवारी दिवसादेखील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवत होता.