⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मनमाडनजीक रेल्वेचा मेगाब्लॉक, या गाड्या विलंबाने धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । रेल्वेचा मेगाब्लॉक आणि त्यामुळे रद्द होणाऱ्या गाड्या यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या आठवड्यात मुंबई विभागात मेगाब्लॉक घेतल्यानंतर आता भुसावळ विभागात मनमाड रेल्वे स्टेशनजवळ अनकाई ते अनकाई किल्ला स्टेशनदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात दररोज तीन दिवस घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे झेलम, सचखंड व गोवा एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. त यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मनमाड – पुणे व मनमाड – औरंगाबाद या मार्गावर अनकाई ते अनकाई किल्ला रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक कामासाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शनिवारी (दि. १२) सकाळी ५.३० ते ९.३० या वेळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे जळगावहून नांदेडकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस दोन तास मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे. तसेच रविवारी (दि. १३) सकाळी ५.३० ते ११.३०च्या दरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कामामुळे जळगावहून पुण्याकडे जाणारा झेलम एक्स्प्रेस मनमाड स्टेशनला थांबविण्यात येणार आहे. तसेच सचखंड एक्स्प्रेस साडेतीन तास मनमाड स्टेशनला थांबविण्यात येणार आहे, तर गोवा एक्स्प्रेस ही गाडी पूर विभागात थांबविण्यात येणार आहे. मात्र, ही गाडी कुठल्या स्टेशनवर थांबविण्यात येईल, हे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले नाही.

तसेच सोमवारी (दि. १४) सकाळी ५.३० ते दुपारी १२च्या दरम्यान घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे जळगावहून पुण्याकडे जाणारा झेलम एक्स्प्रेस अडीच तास मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे, तर सचखंड एक्स्प्रेस चार तास थांबविण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :