जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । आधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवत भाजपने धक्कातंत्र अवलंबलं होतं. त्यामुळे भाजप हायकमांडने ही नेमकी कुठली खेळी खेळली आहे, याची चर्चा रंगली असतानाच नवीन सरप्राईज समोर आलं. शिवसेनेतून भाजपला आलेले राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाचं(Assembly Speaker) तिकिटं देण्यात आलं आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या या शर्यतीत राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांचं नाव चर्चेत होतं. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून या पदासाठी तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षाकडून अद्याप या पदासाठी कुणीही अर्ज दाखल केलेला नाहीये. विधानसभेतील भाजप आणि मित्र पक्षांचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड झाली तर ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.
पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष बदलून आले आहेत. सेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.