जामनेरमध्ये बनावट कापूस बियाणे विक्रीचे रॅकेट उध्वस्त; सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

जून 6, 2026 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे ९ लाख १५ हजार ४१६ रुपये किमतीचा बनावट बियाण्यांचा साठा जप्त केला असून, या प्रकरणी दीपक चौधरी याच्यासह पाचोरा येथील दोघांवर आणि इतर साथीदारांवर विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रोबेशनरी डीवायएसपी (DySP) प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.

jm banavat cotton

जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या दीपक राजमल चौधरी याच्या राहत्या घरात अनधिकृतरित्या कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. या तपासणीदरम्यान घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांची पोती व पॅकेट्स आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ४० गोण्या आणि १०१६ पॅकेट्स जप्त केले आहेत. त्यामध्ये Diya-59 (KDCHH 02 BG II) – 250 पॅकेट्स, Diya-59 (KDCHH 02 BG II) – 200 पॅकेट्स आणि Krish-45 (KDCHH 065 BG II) – 566 पॅकेट्स जप्त करण्यात आले असून त्यांची एकत्रित किंमत ₹9,15,416 इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

वैध परवाना नाही, खरेदी-विक्रीचे पुरावेही गायब!

पोलिसांनी संशयित आरोपी दीपक चौधरी याच्याकडे बियाणे विक्रीचा वैध परवाना, साठा परवाना किंवा विक्रीसंबंधी आवश्यक कागदपत्रे मागितली असता, ती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच जप्त केलेल्या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत किंवा ते कुठून आणले, याबाबत कोणतेही समाधानकारक पुरावे तो सादर करू शकला नाही. प्राथमिक तपासात, संबंधित बियाणे उत्पादक कंपनीची अधिकृत विक्री व्यवस्था व परवानगी न घेता हे बियाणे बाजारात अवैध विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

कायद्याची तरतूद म्हणून जामनेर पंचायत समितीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वरणगाव/जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक राजमल चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा), शेषराव पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा) व इतर संबंधित साथीदरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

“शेतकऱ्यांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून किंवा परवाना नसलेल्या ठिकाणाहून बियाण्यांची खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांचाच वापर करावा.” असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now