
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरालगत असलेल्या धनवाडी शिवारातील एका शेडमधील गोदामात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा चोपडा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून जगन्नाथ जानकीराम महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धनवाडी शिवारातील एका गोदामामध्ये छुप्या पद्धतीने अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित आरोपी जगन्नाथ जानकीराम महाजन याला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून महाजन याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
चोपडा शहरालगत अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची चर्चा परिसरात सुरू आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.





