
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या प्रौढ शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशोक बाबूराव पाटील (वय ५६) आणि त्यांची पत्नी सरिता अशोक पाटील (वय ४८) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे सुसरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांची पत्नी सरिता पाटील हे सोमवारी नेहमीप्रमाणे मजुरांसह शेतात काम करण्यासाठी गेले होते. सुसरी शिवारातील त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने ते काढण्याचे काम पती-पत्नी करीत होते. मात्र, शेतातील काम सुरू असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
दरम्यान, शेतात तण काढत असताना अशोक पाटील यांचा खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. जवळच काम करीत असलेल्या सरिता पाटील यांनाही याच वेळी विजेचा धक्का बसला.
विजेचा धक्का इतका तीव्र होता की, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाटील दाम्पत्याला तातडीने वरणगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.शेतातील विद्युत तार नेमकी कशामुळे खाली पडली आणि दुर्घटनेला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याबाबत अधिकृत तपासातून स्पष्टता येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, अशोक पाटील आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. त्यामुळे पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. साखरपुड्याच्या तयारीत कुटुंबीय व्यस्त असतानाच नियतीने घातलेल्या या घावामुळे कुटुंबाचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ज्या घरात काही दिवसांत मंगलकार्याची लगबग सुरू होणार होती, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





