जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून एक मोठी आणि सामान्यांसाठी दिलासादायक घोषणा केली. यावेळी त्यांनी भारतीयांना दिवाळीला मोठं गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा केली.

काय म्हणाले नेमकं पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या ८ वर्षांत जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, सरकार आता “नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा” कडे वाटचाल करत आहे. या अंतर्गत, सामान्य माणसाला आवश्यक असलेल्या गोष्टींवरील करात मोठी कपात केली जाईल. ते म्हणाले, “आम्ही एक उच्च अधिकार पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये राज्यांशी सल्लामसलत करण्यात आली आहे. कर प्रणाली अधिक सोपी करणे आणि सामान्य माणसाचा भार कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.”

महागाईला आळा बसेल
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, येणाऱ्या जीएसटी सुधारणांमुळे केवळ सामान्य जनतेला दिलासा मिळणार नाही, तर एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) यांनाही मोठा फायदा होईल. या सुधारणांमुळे लहान व्यापारी आणि देशांतर्गत उद्योगांना स्पर्धात्मक धार मिळेल. ते म्हणाले, “तुमच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, जसे की घरगुती उत्पादने, अन्नपदार्थ, उपयुक्त वस्तू स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन चालना मिळेल आणि मागणी वाढेल.” असं ते म्हणाले











