पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा द्या; जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटलांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

मे 27, 2026 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील पाळधी (Paldhi) रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले.

paldhi railway Pratap P

पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी तसेच उपचारासाठी प्रवास करणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र सध्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांना पाळधी येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव येथे जावे लागत असून त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना कृषी व्यवहारासाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रतापराव पाटील यांनी सांगितले. परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या आणि स्थानिक गरज लक्षात घेता काही महत्त्वाच्या गाड्यांना पाळधी रेल्वे स्टेशनवर थांबा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

निवेदनामध्ये खालील गाड्यांना पाळधी येथे थांबा देण्याची मागणी :

१) गाडी क्र. १२१११ – सूरत – अमरावती एक्सप्रेस
२) गाडी क्र. १९००७ – सूरत – भुसावळ एक्सप्रेस
३) खान्देश एक्सप्रेस १९००३ वांद्रा टर्मिनस – भुसावळ

प्रतापराव पाटील यांनी म्हटले आहे की, या गाड्यांना थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला याचा मोठा दिलासा मिळेल. तसेच रेल्वे स्थानकाचा विकास होऊन परिसरातील आर्थिक व व्यापारी प्रगतीलाही चालना मिळेल.

स्थानिक नागरिकांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकहिताचा विचार करून पाळधी रेल्वे स्टेशनवर वरील गाड्यांना तातडीने अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी मागणी प्रतापराव पाटील यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now