जळगाव लाईव्ह न्यूज । ‘पंढरपूर दर्शन विशेष वारी’हून परतत असताना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी एका निराधार वृद्ध महिलेला मदतीचा हात देत सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

याबाबत असे की, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाविकांसाठी विनामूल्य ‘पंढरपूर दर्शन विशेष वारी’ काढण्यात आली होती. विठ्ठल चरणी लीन होऊन सुखाचा प्रसाद घेऊन सर्व वारकरी आणि कार्यकर्ते जळगावकडे परतत होते. मात्र, विठ्ठलाचे खरे रूप पंढरपुरात नाही, तर परतीच्या प्रवासात कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या रूपाने अवतरले!

वारकरी पंढरपूरहुन जळगावकडे परतत असताना रात्रीच्या वेळी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका वृद्ध महिलेची अवस्था प्रतापराव पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ तिची विचारपूस करून उबदार शाल पांघरून दिली तसेच अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मदतीची व्यवस्था केली. एखाद्या मुलाने आपल्या आईची सेवा करावी, तसाच हा अलौकिक प्रसंग तिथे उपस्थित सर्वांनी अनुभवला. प्रतापरावांनी कसलाही राजशिष्टाचार न बाळगता थेट त्या वृद्ध आजीसमोर गुडघे टेकले आणि अत्यंत प्रेमाने त्यांची विचारपूस केली.
संवादादरम्यान संबंधित महिलेने आपण मुंबईतील रहिवासी असून कौटुंबिक कारणांमुळे अडचणीत सापडल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली. मोठ्या आशेने तिने मुलाला वाढवले, सुनेला घरात आणले. पण त्याच पोटच्या मुलाने आणि सुनेने म्हातारपणात या माऊलीचा सांभाळ करण्यास साफ नकार दिला आणि तिला घराबाहेर हाकलून दिले, असं सांगितले. या माऊलीला कुर्डूवाडी स्थानकावर प्रतापराव पाटील यांच्या रूपाने प्रत्यक्ष देवदूतच भेटला. या प्रसंगामुळे उपस्थित वारकरी आणि प्रवाशांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक करत माणुसकीचा हा आदर्श असल्याची भावना व्यक्त केली.









