विवाहितेला पतीनेच दाखविले अश्लील व्हिडीओ, सासरा, मावस दिराने केला अत्याचार, माहेरी आली आणि तावडीतून सुटली

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । सासरा व पतीच्या मावसभावने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच इतरांशीही तसेच संबंध ठेवण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून दबाव होता, असा आरोप करत भडगाव तालुक्यातील पांढरद येथील माहेरी असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सासरचे सर्व जण नाशिक येथील असून, या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पांढरद येथील विवाहितेचा नाशिक येथील एका तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतर पती अश्लील व्हिडिओ दाखवून विवाहितेला त्याप्रमाणेच कृत्य करण्याचा आग्रह धरत होता. त्याला विवाहितेने विरोध केला. ही बाब घरात समजल्यावर त्यांनीही ‘करावेच लागेल, तू बाहेरच्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवले तर माहेरच्या लोकांनाही पैसे देऊ,’ असे सांगितले. जानेवारी महिन्यात दुपारी दोनच्या सुमारास घरी सासू, दोन्ही नणंदा असताना सासरे विवाहितेच्या बेडरूममधे आले. विवाहिता झोपेत असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच तोंडात रुमाल कोंबला. तेवढ्यात पतीचा मावसभाऊही तेथे आला. त्यानेही बळजबरीने शारीरिक संबंध केले. याबाबत पतीकडे तक्रार केल्यानंतर पतीने दुर्लक्ष करत त्यात काय बिघडले, असे सांगितले.

शिवाय घरात अनेक बाहेरचे लोक यायचे. सासूच्या बेडरूममध्ये जायचे, एके दिवशी सासूच्या बेडरूमची साफसफाई करताना तेथे अश्लील अल्बम आढळून आले. ही बाब माहेरी आल्यानंतर संबंधित विवाहितेने घरच्यांना सांगितली. याशिवाय गाडीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा सुरू होता. त्यावरून विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांवर तर विवाहासाठी मध्यस्थी करणारा मुंबई येथील एक यांनेही ‘सासरचे मंडळी जे करायला सांगत आहेत, ते कर. ते तुझ्या घरच्यांना पैसे देतील,’ असे सांगायचे. त्यामुळे त्यांच्यावरही भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे तपास करीत आहेत.

सदर घटनेने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही सर्व तेच काम करतो, तू पण ते कर’ असा दबाव विवाहितेच्या सासरच्या मंडळींकडून होता. याशिवाय घरी सातत्याने बाहेरच्या व्यक्तीही येत असत, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केल्यास त्यांच्या हाती बरेच काही लागू शकते अशी शक्यता आहे.