बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा पूजनावरून महापालिकेत ‘राजकारण’

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनावरून चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. (shinde vs thakre in jalgoan)

तर झाले असे की, शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. मात्र त्यावेळी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले नव्हते किंबहुना याची कोणतीही कल्पना शिंदे गटाला नव्हती.

महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर त्या ठिकाणी शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बाळासाहेबांचा वेगळा फोटो आणला आणि त्याचे माल्यार्पण करण्याचे ठरविले. आधीच त्या ठिकाणी माल्यार्पण झाले होते. यामुळे दुसरा फोटो लावून त्या ठिकाणी माल्यार्पण करू नये असे शिंदे गटाच्या नगरसेवकांना महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. (shinde vs thakre in jalgoan)

अखेर शिंदे गटाने देखीलआधी माल्यार्पण केलेल्या फोटोलाच माल्यार्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली. मात्र या सगळ्या काळात चांगलेच राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत शिंदे गटाचे नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, शासकीय मानवंदना देताना नगरसेवक म्हणून आम्हाला आमंत्रित करणे हे महानगरपालिकेचे व महापौरांचे कर्तव्य होते. मात्र त्यांनी आम्हाला कोणताही निरोप दिला नाही. यामुळे आम्ही वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी फोटो घेऊन गेलो. मात्र आम्हाला त्या ठिकाणी आधीपासूनच फोटो आहे हे समजताच आम्ही बाळासाहेबांचा दुसरा फोटो न लावता असलेल्या फोटोलाच माल्यार्पण केले आणि बाळासाहेबांना मानवंदना दिली.