जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२५ । पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात एका अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत सात जणांना अटक केली असून अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केले. या छापेमारीने राजकारणात खळबळ उडाली आहे

काय आहे प्रकार?
पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या अवैधरित्या सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, मद्य व हुक्के जप्त केले असून, पार्टीमध्ये नशेचे सेवन सुरू होते. पार्टीत सहभागी असलेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्टीत तीन महिला आणि ४ पुरुष सहभागी होते. विशेष बाब म्हणजे, या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून, त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. तपास सुरू आहे.









