जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीविरोधात प्रशासनाने ‘झीरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली असून, आता थेट नदीपात्रात उतरून कारवाईला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दुर्गम भागातील नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. काही ठिकाणी दुचाकीवरून, तर काही भागात पायी जात अधिकाऱ्यांनी अवैध वाळूसाठ्यांची झाडाझडती घेतल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

१८ ऑगस्ट रोजी ज्या-ज्या भागात अवैध वाळूसाठे आढळून आले होते, त्या संपूर्ण परिसराची जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी बुधवारी पाहणी केली. या भागात पुन्हा नव्याने वाळूचा उपसा झाला आहे का, तसेच वाळू लपवून ठेवण्यात आली आहे का, याची अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून खात्री केली.

या कारवाईदरम्यान तहसीलदार शीतल राजपूत, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह महसूल आणि पोलिस प्रशासनाचा ताफा उपस्थित होता. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या प्रकारात सहभागी आढळणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ग्रामस्थांशी साधला संवाद
पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी कानळदा, खेडी आणि आवार या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाबाबत ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेण्यात आली. गावात किंवा नदीकाठच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. अवैध वाळू उपशावर प्रशासनाने थेट लक्ष केंद्रित केल्याने आगामी काळात वाळूतस्करांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.







