जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास संपूर्ण शहरात अचानक व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ मोहिम राबविले. या अचानक झालेल्या धडक मोहिमेमुळे सराईत गुन्हेगार, संशयित व्यक्ती आणि अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस प्रशासनाने अत्यंत गोपनीयतेने आखलेल्या या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भाग, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वस्त्या, संशयितांची ठिकाणे, फरार आरोपींचे संभाव्य वास्तव्य आणि संवेदनशील परिसरांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली. पहाटेच्या शांततेत सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान अनेक संशयित व्यक्तींची पडताळणी, चौकशी आणि कसून तपासणी करण्यात आली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारांवर वचक बसवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह ‘दंगल नियंत्रण’ व स्थानिक पोलिसांची नाकेबंदी
या विशेष कोंबिंग ऑपरेशनचे गांभीर्य लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेचे नेतृत्व केले.मोहिमेत सहभागी प्रमुख अधिकारी म्ह्णून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांचा समावेश होता.
सहभागी पोलीस निरीक्षक आणि पथके:
स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकाचे उद्धव ढमाले, भुसावळ तालुका पोलीस स्थानकाचे महेश गायकवाड, मुक्ताईनगरचे आशिष अडसूळ, बोदवडचे आशिष लवंगडे, सावदाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नशिराबादच्या योगिता नारखेडे, निंभोरा येथील मीरा देशमुख आणि वरणगावचे अमित बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथकाचा फौजफाटा या कारवाईत सामील झाला होता.
या मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, न्यायालयातून फरार झालेले आरोपी, प्रतिबंधक कारवाईस पात्र असलेल्या व्यक्ती आणि शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.पहाटेच्या वेळी अचानक भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि सायरनचा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा रंगली होती. पोलिसांच्या या तडकाफडकी आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मात्र मोठी धास्ती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस दलाकडून अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.









