⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगाव शहरातील उद्योजक पिता-पुत्रीने केले प्लाज्मा दान

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२१ । माहेश्वरी सभा, महेश प्रगती मंडळ व रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात एक उद्योजक व त्यांच्या मुलीने प्लाज्मा दान केला. या पिता-पुत्रीने प्लाज्मा दान करण्याबाबत समाजामध्ये एक सकारात्मक संदेश दिला आहे.

माहेश्वरी सभेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक कोरोना रुग्णांना प्लाज्मा दानातून जीवदान मिळतेय. दमयंती इंडस्ट्रीजचे संचालक पवन अशोक मंडोरा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी शगुन अशोक मंडोरा, तसेच त्यांच्यासह महेश प्रगती मंडळाचे सचिव आनंद पलोड यांनी रेडक्रॉस सोसोयटीत प्लाज्मा दान केले. यानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मुलीच्या निर्णयाचा अभिमान

प्लाज्मा दान करणारे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण होते. कोरोनावर मात केल्यानंतर शगुन मंडोरा हिने प्लाज्मा दानाबाबत माहिती घेतली. तिने प्लाज्मा दान करण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. मुलीचा दातु्त्वभाव लक्षात घेता तिचे वडील पवन मंडोरा यांनीही माहेश्वरी सभेच्या माध्यमातून प्लाज्मा दान करण्याचा निर्णय घेतला. मुलगी प्लाज्मा दान करू शकते, तर आपणही प्लाज्मा दान करू शकतो, असे पवन मंडोरा यांना वाटले. या वयात मुलीने घेतलेल्या सामाजिक निर्णयाचा अभिमान वाटतो, असे मत पवन मंडोरा यांनी व्यक्त केले. तर प्लाज्मा दानामुळे कोणतेही दुष्परिणाम नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना जीवदान मिळून त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो. मनातील गैरसमज दूर करुन प्लाज्मा दान करावे, असे आवाहन प्लाज्मा दाते मंडोरा पिता-पुत्री व पलोड यांनी केले. याप्रसंगी प्लाज्मादान, रक्तदान, प्लेटसलेट दाते व पत्रकार अय्याज मोहसीन यांचाही सत्कार करण्यात आला.

रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्लाज्मा दानाबाबत मार्गदर्शन केले. तर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन व सचिव विनोद बियाणी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

या वेळी माहेश्वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, शहर सचिव विलास काबरा, प्रोजेक्ट चेअरमन नचिकेत जाखेटिया, अमित बेहडे, बाळकु्ष्ण लाठी, महेश प्रगती मंडळाचे सदस्य आशिष बिर्ला, राजेश राठी, अँड.दीपक फापट आदी उपस्थित होते.