⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार… भारतीयांसाठी सातासमुद्रापलीकडून येतेय गुड न्यूज!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । वाढत्या इंधन दरापासून दिलासा देत मोदी सरकारने मागील काही दिवसापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल ९ रुपयाने तर डिझेल ७ रुपयाने स्वस्त झाले होते. मात्र अशातच आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यावेळी सातासमुद्रापलीकडून ही आनंदाची बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरू लागल्या असून आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल प्रति बॅरल $112-118 च्या श्रेणीत
कच्च्या तेलाच्या सतत वाढणाऱ्या किमती कमी करण्यासाठी OPEC+ देशांनी (OPEC+) मोठा निर्णय घेतला आहे. कच्चे तेल प्रति बॅरल $112-118 च्या श्रेणीत आहे. गेल्या चार महिन्यांत क्रूडच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईचा आलेख वाढत आहे. पण आता OPEC+ देशांनी क्रूडची आग शमवण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रूडच्या किमती घसरण्याची शक्यता
तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना (OPEC) आणि रशियासह इतर सहयोगी देशांनी जुलै-ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रुडच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे. OPEC+ देशांनी जुलै-ऑगस्टमध्ये 6.48 लाख बॅरल क्रूड उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये कच्च्या तेलाचा वापर कमी झाला
OPEC+ देशांच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की, वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळू शकतो. 2020 मध्ये, कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाच्या वापरात घट झाली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीही खाली आल्या. त्यावेळी OPEC+ देशांनी किंमत स्थिर ठेवण्यासाठी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली होती.

अमेरिकेत कच्चे तेल ५४ टक्के महागले आहे
सध्या OPEC+ देश दररोज 4.32 लाख बॅरल क्रूडचे उत्पादन करत आहेत. पुढील महिन्यापासून ते 2.16 लाख बॅरलने वाढवून 6.48 लाख बॅरल प्रतिदिन करण्याचे मान्य करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत, OPEC + देशांना अद्याप क्रूड उत्पादन वाढवायचे नव्हते. पण, अमेरिकेत पेट्रोलच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 2022 च्या सुरुवातीपासून अमेरिकेत कच्चे तेल 54 टक्के महाग झाले आहे.

OPEC च्या निर्णयानंतर न्यूयॉर्कमध्ये क्रूडची किंमत 0.9% ने घसरून $114.26 प्रति बॅरल झाली. कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्याने इंधनाच्या चढ्या दरात निश्चितच दिलासा मिळणार आहे. यासोबतच महागाईही कमी होण्याची अपेक्षा आहे.