⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दरवाढ : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, उद्यापासून नवीन दर लागू होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । गेल्या साडेचार महिन्यापासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. मंगळवार दि.२२ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल पंप, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यातच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. मंगळवारी सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरने किरकोळ बाजारात वाढ होणार आहे.

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात 25 रुपयांची विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये काहीशी वाढ होणार आहे.