⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले : जळगावातील एका लिटरचे दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । देशभरात आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डिझेलची किंमत शंभरीच्या जवळ गेली आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत आहे. आज पेट्रोलचे दर २५ ते ३० पैसे प्रति लीटरने वाढवले आहेत. तर डिझेल दरात आज २५ ते ३० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढी नंतर जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर चा दर १०९.६३ रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९८.१३ रुपये इतका आहे.

गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर २७ रुपये ८४ पैसे, तर डिझेल दर २१ रुपये २२ पैशांनी वाढले. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२० रोजी पेट्रोल ८८.८४ रुपये, तर डिझेल ७६.७९ रुपये लिटर असे होते. दरम्यान, वर्षभरातच पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने कुटुंबाचा मासिक खर्च सरासरी २० टक्क्यांनी वाढला आहे.

कोरोना संकटाने गेल्या दीड वर्षात अनेकांचे रोजगार गेले. कुटुंबप्रमुखांना संसार चालवताना अजूनही तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर तेजीत आहेत. पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. केवळ सप्टेंबरमध्ये एकवेळा ३८ पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस भाव वाढते असल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेल देखील ९८ रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे आगामी काळात खासगी व महामंडळाच्या बसेसचे भाडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.