⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

इंधन दरवाढीचा झटका ! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ, वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । मागील दोन दिवसाच्या दरवाढीनंतर काल गुरुवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलमुळे (Diesel) जनता महागाईने होरपळली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर जळगावमध्ये (Jalgaon) पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११३ रुपयांवर गेला आहे. तर डिझेल ९६ रुपयांवर गेले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर चालू आठवड्यात मंगळवारी प्रथमच इंधनाच्या (Fuel)किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तर काल गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. तर आज शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 112.51 तर डिझेल 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.32 आणि डिझेल 97.50 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 111.76 तर डिझेल 94.55 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 111.37 आणि 94.15 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 111.53 रुपये लिटर आणि डिझेल 94.33 रुपये लिटर इतके आहे.

इंडियन ऑईलने रशियाकडून कच्चे तेल विकत घेतले
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत रशियाकडून सवलतीच्या दराने तेल खरेदी करत आहे. इंडियन ऑइलने बुधवारी कच्च्या तेलाच्या मोठ्या मालाची खरेदी पूर्ण केली आहे. यासोबतच कंपनीने पश्चिम आफ्रिकन तेलही मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने मे महिन्यासाठी रशियाकडून 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. तर पश्चिम आफ्रिकेकडून २० लाख बॅरल तेल खरेदी करण्यात आले आहे. कंपनीने रशियाचे हे कच्चे तेल ‘विटोल’ नावाच्या व्यापाऱ्याकडून मोठ्या ‘सवलतीत’ विकत घेतले आहे.