⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

बिग ब्रेकिंग : परमबीर सिंग गुन्ह्यात जळगावच्या माजी एलसीबी निरीक्षकांचे देखील नाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२१ । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावचे माजी एलसीबी निरीक्षक बापू रोहोम यांचा देखील संशयितांमध्ये समावेश आहे. अकोल्याचे पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

परमबीर सिंग यांच्यावर नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दावा

त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा भीमराज घाडगे केला आहे. अकोल्यात दाखल गुन्ह्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा आरोप आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल

तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे. संशयितांच्या नावांमध्ये जळगावचे माजी एलसीबी निरीक्षक बापू रोहोम यांच्या नावाचा देखील समावेश आहे.