⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पाचोऱ्याचे नगरसेवक विकास पाटलांनी घेतली कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । आजच्या परिस्थितीत सगळीकडे कोरोना सारख्या गंभीर आजाराने थैमान घातले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून याबद्दल बरेचसे गैरसमज पसरले असल्याने ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशा काही व्यक्तींच्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांनी कोरोनाग्रस्त नातेवाईकांना दवाखान्यात दाखल करतांना आपली ओळख देतांना खोटे नाव व भ्रमणध्वनी देऊन त्यांच्या पासून दुर पळाले तर काही ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या अंत्यविधी करिता हजर न रहाता पाठ फिरवली. परंतु समाजात अजुनही चांगल्या लोकांची कमी नाही.

कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही हजारो समाजसेवक, समाजसुधारक लोकांनी स्वत:च्या कुटुंबाची व स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोना बाधीतांना मदत करण्यासाठी वाहून घेत कोरोनाबाधीतांना योग्य उपचार मिळवून देत गरजूंना रक्त, प्लाझ्मा, ऑक्सिजन, अल्पदरात रेमडेसिवीर इंजेक्शन व औषधी मिळवून देत डॉक्टरांना भेटून वाजवी बिलात उपचार मिळवून मानसिक आधार देत हजारो कोरोना बाधीतांना जीवदान देऊन घरी सुखरूप परत पाठवले. असेच एक सर्व परिचित असलेले व कोरोनाच्या कालावधीत धाऊन जाणारे पाचोरा नगरीचा नगरसेवक व नवजीवन विद्यालयात विद्यादानाचे काम करत असलेले विकास पाटील नावाचे अवलिया समाजसेवक पाचोरा शहरातील परिसरात नव्हे तर पाचोरा – भडगाव तालुक्यातील जनतेची सेवा करतांना दिसून येत आहे.

आजपर्यंत विकास पाटील यांनी गरजु रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्यापासून तर प्रत्येक कोविड सेंटरला जाऊन कोरोना बाधीतांची भेटी घेत गरजवंताला रक्तपुरवठा, प्लाझ्मा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, सोबतच लागणाऱ्या औषधी योग्य दरात तर शक्य होईल तितक्या प्रमाणात स्वखर्चाने पुरवून तसेच जेवणाची व्यवस्था करण्यापर्यंत मदत करत आहेत. या त्यांच्या कार्याची तालुक्यातच नव्हे तर जिल्हा पातळीवर जोरदार चर्चा सुरु असून त्यांचे कौतुक होतांना दिसत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईक तर त्यांना देवदूत मानत आहेत. यामागे कारणही तसेच आहे विकास पाटील हे रुग्णांना मदत करत आहेतच परंतु मागे लागु करण्यात आलेल्या कडकडीत लॉकडाऊनच्या काळात जवळपास ६०० कुटूंबियांना किराणा मालाचे किट घरपोच दिले होते. तसेच ९ हजार मास्कचे वाटप केले. प्रत्येक गल्लीत निर्जंतुकीकरण केले होते. तसेच पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेचे मदतीसाठी बरेचसे फोन येतात अशा गरजूंना विकास पाटील हे शक्य होईल तेवढी मदत रात्रंदिवस करत असतात.

मनमिळाऊ व शांत स्वभाव, समाजसेवेची ओढ, योग्यवेळी योग्य मार्गदर्शन व कोरोनासारख्या संकटातही जीवाची पर्वा न करता गरजूंना मदत मिळवून देत असल्याने आजतरी पाचोरा तालुक्यासह जिल्हाभरात विकास पाटील यांचे नाव चर्चेत आहे.