जळगाव लाईव्ह न्यूज । पी.एम. किसान सन्मान निधी योजनेद्वारे (PM Kisan Samman Yojana) पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यानंतर २ हजार रुपयाप्रमाणे वार्षिक ६००० रुपये दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १८ हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले असून यानंतर शेतकरी १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपुर, बिहार येथील समारंभात वितरीत होणार आहेत. हा कार्यक्रम देशामध्ये “किसान सन्मान समारोह” म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे.

पी एम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुमारे रक्कम रुपये १९६७ कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर सदरचा समारोह आयोजित करण्यात येत आहे. समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषि शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण इ. कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रोस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. या ठिकाणावरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.
मुख्यमंत्री, व कृषी मंत्री या समारोहास सातारा येथून सहभागी होणार आहेत. राज्यांमध्ये सर्वदूर कृषि विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा समारोह साजरा करण्यात येणार आहे. सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे असे कृषी आयुक्तालयाकडून आवाहन करण्यात येत आहे.