जळगाव जिल्हावाणिज्य

गॅस सबसिडीबाबत १ ऑक्टोबरपासून नवा नियम ; ग्राहकांनी लगेच ‘हे’ काम करावे, अन्यथा..

जळगाव लाईव्ह न्यूज । अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची ई-केवायसी आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करण्याची मुदत आता संपत आली आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून गॅस रिफिल बुकिंगसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदानित गॅसचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी ई-केवायसी आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी थांबण्याची शक्यता आहे.

अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि प्रत्यक्ष घरगुती ग्राहकांनाच मिळावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ग्राहकांची माहिती आधारशी पडताळून पाहिल्यामुळे अनुदान वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित गॅसचा व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणांसाठी होणारा गैरवापर रोखण्यासही मदत होणार आहे. दुहेरी गॅस कनेक्शन असलेले ग्राहकही अपात्र ठरू शकतात.

असे आहेत तीन पर्याय
डिलिव्हरी बॉय : गॅस सिलिंडर डिलिव्हरी कर्मचारी मोबाइल अॅपवरून ग्राहकाच्या घरीच बायोमेट्रिक प्रमाणीकरण करेल.
गॅस एजन्सी : ग्राहक स्वतः वितरकाच्या (एजन्सी) कार्यालयात जाऊनही प्रक्रिया मोफत पूर्ण करू शकतात.
स्वतःचा मोबाइल : इंडेनसाठी इंडियन ऑइल वन, भारत गॅसचे हॅलो बीपीसीएल व एचपीसाठी एचपी-पे अॅपने ग्राहक घरी बसून प्रमाणीकरण करू शकतात.

ग्राहकांनी काय करावे?

गॅस सबसिडीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपले ई-केवायसी आणि बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे. विशेषतः १ ऑक्टोबरपासून रिफिल बुकिंगसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असल्याने ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनची स्थिती तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button